औरंगाबाद- पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारचा नसून, सर्व राज्य सरकारांचा आहे. त्यांनी सांभाळून पाऊल उचलण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. अन्न व पुरवठा मंत्री गिरिश बापट यांनी कोल्हापूर येथे आश्वासन दिले होते, मात्र रेशन दुकानदारंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सरकारने सुरु केले आहे. अशा कठोर शब्दात स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचेे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. मोदी यांच्या नेतृत्वात स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आमखास मैदान येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी प्रल्हाद मोदींनी फडणवीस सरकार फसवे असल्याचे म्हटले.
स्वस्त धान्य दुकाने बंद करण्याची सरकारची चाल असल्याचा आरोप या मोर्चातून करण्यात आला. आमखास मैदान येथे आयोजित सभेत प्रल्हाद मोदींनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश बापट यांच्यावर सडकून टिका केली. ते म्हणाले, 'फडणवीस सरकार आणि त्यांचे मंत्री गिरीश बापट गरिबांना २३ रुपयांत गहू, २७ रुपयांमध्ये तांदूळ विकत घ्यायला मजबूर करत आहे.' गरिबांना महागडे अन्न धान्य खरेदी करायला लावून फडणवीस यांना कोणती बक्षिसी मिळणार आहेे, की बापटांना काही प्रमोशन मिळणार आहेे का? असा सवाल त्यांनी केला. मोदी म्हणाले, देशातील एकाही राज्याने अद्याप हा निर्णय लागू केलेला नाही. मात्र महाराष्ट्र सरकार गरिबांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.
मोदींच्या उज्ज्वला गॅसचा त्यांच्याच बंधूंनी केला भांडाफोड
पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी उज्ज्वला गॅस योजनेचा त्यांचेे बंधू प्रल्हाद मोदींनी येथील जाहीर सभेत भांडाफोड केला. ते म्हणाले, 'सरकारने मोठा गाजावाजा करुन उज्ज्वला गॅस योजना सुरु केली. मात्र प्रत्यक्षात एकदा सिलिंडर संपल्यानंतर परत ते गरिबांना मिळत नाही ही वस्तूस्थिती आहे.' पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चात ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघ, औरंगाबाद जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघ यांचाही सहभाग होता. या मोर्चाचे नेतृत्व प्रल्हाद मोदी, डी.एन. पाटील यांनी केले.










